उपक्रमातून शिक्षण
क्रांतिकारकांची माहिती क्रांती महिन्यात
आज आपण उपक्रमातून शिक्षण या सदरखाली ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका अंतर्गत असलेली जिल्हा परिषद शाळा पिसवली या उपक्रमशील शाळेतील राज्यपुरस्कार प्राप्त अजय लिंबाजी पाटील जे की येथे पदवीधर शिक्षक यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमापैकी एका सुंदर उपक्रमाची माहिती पाहणार आहोत. जिल्हा परिषदेत ते गेल्या २९ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांची प्रथम नेमणूक दिनांक २५/०४/१९८९ अशी असून यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद शाळा वाहोली, कल्याण ठाणे येथे कार्य केले आहे. ते एक क्रियाशिल शिक्षक असून विद्यार्थ्यांचे आवडते आहेत. त्यांनी आपल्या शाळेत एक सुंदर आणि सर्वांनी त्याचे अनुकरण करावे असा उपक्रम राबविला आहे.
त्यांच्या उपक्रमाचे नाव आहे, क्रांतीकारकांच्या सहवासाने भारावली पिसवली शाळा.
आज आपण स्वतंत्र भारतात आनंदाने राहत आहोत.परंतु स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे गुलामीचा काळ. आपल्या भारत देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. इ.स. १६०० व्या शतकात इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून भारतात व्यापारासाठी आलेले इंग्रज हे आपल्या देशात राज्यकर्ते झाले. आपल्या देशातच आपण गुलाम म्हणून राहू लागलो. या गुलामगिरीतून आपल्या देशाला मुक्त केले ते आपल्या महान नेत्यांनी, क्रांतिकारकांनी. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता घरादाराचा, संसाराचा त्याग करून आपल्या देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवायचे हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. अनेकांनी सुखी संसार सोडून देशाची सेवा केली. मग त्यामध्ये महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा, सुभाष चंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारखे क्रांतीकारक आणि महान नेते होतेच परंतु अगदी बारा वर्षाच्या शिरिषकुमार सारखे शाळकरी मुलेही क्रांतिकारक म्हणून देशाच्या कामी आली. या स्वातंत्र्यलढ्याची, क्रांतिकारकांची आठवण व विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावा, क्रांतिकारकांचे कार्य व त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने गेले बारा वर्षे जिल्हा परिषद शाळा पिसवली येथे ऑगस्ट क्रांती पंधरवडा साजरा केला जातो.
एक ऑगस्ट रोजी लो. टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करुन त्या दिवसांपासून शाळेत आँगस्ट क्रांती पंधरवडयाला सुरुवात केली जाते.
1 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींजींनी इंग्रजांना चले जाव असा आदेश दिला आणि आपला देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या समीप पोहचला. परंतु आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे. मुलांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागृत व्हावी यासाठी क्रांतिकारकांच्या कथा पिसवली शाळेत मुलांना सांगितल्या जातात. पदवीधर शिक्षक अजय पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेतला जातो. या कथामालेत हुतात्मा शिरिषकुमार, भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील, चंद्रशेखर आझाद, लहुजी राघोजी साळवे, नारायण नागो पाटील, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबू गेनू, भगतसिंग,
चाफेकर बंधु यांच्या कथा सांगितल्या जाते तर मंगल पांडे हा चित्रपट मुलांना दाखवला जातो
हे कथाकथन अजय पाटील, सुभाष जनबंधु, मेघा पाटील, शर्मिला गायकवाड, महेंद्र अढांगळे, सरीता काळे या शिक्षकांनी तयार केले आहे. तर भिवंडी तालुक्यातील श्रीमती सुचिता आरज मॅडम यांचेही कथाकथन या पंधरवडयाच्या निमित्ताने झाले आहे. त्यांनी चाफेकर बंधुंची कथा मुलांना समजेल अश्या भाषेत सांगितली.
याच कार्यक्रमात इयत्ता सहावीचा विद्यार्थी करण गोंड, सातवीची विद्यार्थीनी शिवानी संभाजी, सानिया शेख, आठवीचे विद्यार्थी सारीका नरळे, सारीका वेह्ले, पाचवीची मुले श्वेता चव्हाण, निकीता राठोड यांनीही कथावाचन केले.
काही मुलांनी या कथा लिहून काढल्या आहेत. तर काही मुलांनी क्रांतिकारकाच्या कथांचा संग्रह तयार केला आहे.
पंधरा ऑगस्ट रोजी इयत्ता सहावीच्या मुलांनी शहीद शिरीषकुमार यांच्या जीवनावरील नाट्यप्रसंग सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी क्रांतीकारकांच्या वेशभूषेत मुले प्रभातफेरीत सामील झाली होती.
या उपक्रमातून भारतीय स्वातंत्र्य लढयाची आणि जुलमी इंग्रज राजवटीची माहिती मुलांना मिळते. देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतीकारकाच्या कार्याची माहिती मिळते. विद्यार्थांमध्ये देशप्रेम वाढीस लागते. शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होते. मान्यवरांची व्याख्याने ऐकल्याने विद्यार्थ्यांचे भावविश्व व्यापक बनते. तसेच नकळत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जातो. १८५७ उठाव, त्याची कारणे, उठावाचे लोण, व्याप्ती, उठावाच्या अपयशाची कारणे, सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, क्रांतीकारकांची भूमिगत चळवळ हे पाठ विद्यार्थ्यांना शिकवले जातात. दोनशे सव्वा दोनशे विद्यार्थी एकावेळी या कथा ऐकतात.
गेली बारा वर्षे हा ऑगस्ट क्रांतीचा हा कार्यक्रम पिसवली शाळेत सातत्याने साजरा होतो.
संपूर्ण शाळा पंधरा दिवस क्रांतिकारकांच्या सहवासाने भारावून जाते. या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी कौतुक केले आहे.तर अनेक शाळांना हा उपक्रम दिशा दर्शक ठरला आहे. आपणास या उपक्रमाविषयी जाणून घ्यायचे असेल तर अजय लिंबाजी पाटील यांच्या ajaylimbajipatil@gmail.com या email id वर किंवा 8422031680 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे.
संकलन : नागोराव सा. येवतीकर
संयोजक, फ्रेश शालेय परिपाठ
9423625769