Monday, 5 August 2019

शिवणी येथे गणवेष वाटप


शिवणी ता. देगलूर येथे शालेय गणवेश वाटप

आज दि.05/08/2019 रोजी जि.प.प्रा.शा.शिवणी येथे पवित्र श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी सणानिमित्त विद्यार्थ्यांना शै.वर्ष 2019-20 अंतर्गत शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष शा.व्य.स.अध्यक्ष श्रीमान  लक्ष्मण आलुरे,प्रमुख अतिथी म्हणून शिवणी गावचे सरपंच तथा माजी पं.स.सदस्य श्री रमेशदादा सोनकांबळे,शिवणी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक मु.अ.श्री जाधव हनमंत सर, उप.सरपंच श्री बसवंत जक्कावार,तं.मु.अध्यक्ष श्री वीरभद्र पाटील,श्री मोगावर शिवराज सर,श्री उमाकांत बुक्कावार,श्री सतीश वाघमारे,डॉ.सदानंद मंदाडे आणि समस्त शिक्षणप्रिय गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
      कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अशी की,सर्व शिक्षा अभियान अंतर्गत एकूण 179 विद्यर्थ्यांपैकी सर्व मुली आणि अनु.जाती.,अनु.जमाती,बी.पी.एल.मुले असे एकूण 129 मुले यांनाच दोन गणवेश असताना शाळेचे मु.अ.श्री जाधव हणमंत सर आणि शा.व्य.स.अध्यक्ष यांच्या निस्वार्थी त्यागामुळे  खुल्या आणि N.T. प्रवर्गातील सरसकट 50 मुलांना दोन दोन गणवेश प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक यांचेकडे लग्नातील आहेराप्रमाणे त्यांच्या मांडीवर ठेवून देण्यात आले.त्यामुळे खुल्या आणि NT प्रवर्गातील गरीब व  आर्थिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांना खरा न्याय आणि मोठा आधार मिळाला आहे.
   तसेच एकीकडे समाजातील सण आणि उत्सव नाहीसे होत चालले असताना त्या सणांना नवसंजीवनी देण्याचे काम शाळेतील सर्व शिक्षक आणि उत्साही  विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.समस्त गावकरी आणि मान्यवरांच्या समक्ष शाळेतील सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पंचमीची "भुलई"खेळली.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मु.अ.श्री जाधव सरांनी केले.तर सूत्रसंचालन श्री विश्वनाथ पाटील सर यांनी केले.आभार श्री जनार्दन जाधव सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गंगाधर द्याडे सर,श्री इररेड्डी मंदाडे सर,श्री जाकेरपाशा मरखेलकर सर,श्री प्रमोद रावणगावे सर आणि श्री भोसले तानाजी सर यांनी  विशेष प्रयत्न केले.
      शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले.

*शब्दांकन=श्री भोसले तानाजी नि.(स.शि.प्रा. शा.शिवणी कें.होट्टल ता.देगलूर)*.

Monday, 15 July 2019

पालक मेळावा शिवणी

प्रा.शा.शिवणी ता. देगलूर  येथे पालक मेळावा संपन्न

"ही आवडते मज मनापासूनि शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा." या म्हणीप्रमाणे
       आज दिनांक 15:07:2019 रोजी जि.प.प्रा.शा.शिवणी येथे आजी माजी विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शा.व्य.स.चे उपाध्यक्ष श्री बस्वराज तंगावार प्रमुख अतिथी म्हणून तं.मु.समितीचे अध्यक्ष श्री वीरभद्र पाटील,माजी अध्यक्ष श्री संग्राम जळबावार,श्री माधव मामा जक्कावार,श्री आनंदजी भीमावार,श्री बसवंत कवरे,आणि देवापूर येथील विद्यार्थीप्रिय आणि शिक्षणप्रेमी पालक श्री बसवंत आमटे हे उपस्थित होते.
"शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा."
     शाळेतील काही  विद्यार्थिनींनी आपल्या मंजुळ स्वरात उपस्थित सर्व मान्यवर आणि पालकांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मु.अ.श्री जाधव हणमंत सर यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी सर्व पालकांना शाळेच्या सध्यस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यात समेट घडून येणे महत्वाचे आहे तेंव्हाच शाळेचा पर्यायाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा सर्वांगीण विकास होतो."विना सहकार नही उद्धार"या म्हणीप्रमाणे शाळेतील सर्व आजी माजी शिक्षणप्रेमी विद्यार्थी पालकांनी शाळेच्या विकासासाठी एकत्र येऊन शाळेचे आणि शिवणी गावचे ऋण फेडणे आणि नाव रोशन करणे गरजेचे आहे.शाळेच्या विकासासाठी शाळेतील सर्व पालकांनी प्रत्येकी एक हजार (1000$) देण्याचे आश्वसन दिले आणि जमलेल्या निधीतून शाळेतील सर्व भौतिक सुविधा पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली.
शाळेचे मु.अ.यांनी येत्या काही दिवसात शाळेला ISO मानांकन मिळवून देण्याचे आश्वसन दिले.त्यासाठी गावातील पालकांनी 175 विद्यार्थ्यांच्या आणि गावातील काही याचं शाळेतून शिकून मोठ्या पदावर विराजमान झालेल्या विद्यार्थ्यांकडून भरघोस मदत शाळेसाठी जमा करून देऊन देगलूर तालुक्यातील पहिली डिजिटल असलेल्या  शाळेला प्रगतीच्या एका अतिउच्च स्थानावर पोहचवण्याचे आश्वसन दिले.ज्यामध्ये शिवणी गावचे नाव रोशन करणारे भूमिपुत्र *अजय माधवराव पाटील,अक्षय माधवराव पाटील दोनीही (PSI)आणि चैनपुरे गुरुजी* यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला."ज्या घरट्याने पंखात उंच गगनभरारी घेण्याचे बळ निर्माण केले त्याला कसे विसरावे" या भावनेतून आपणही शाळेचे काहीतरी ऋण फेडणे लागते आणि त्यांच्याकडूनही भरीव मदत करून घेण्याचे मान्य करण्यात आले.  उपस्थित पालकातून लगेच पैसे जमा करून जमा रकमेचा योग्य विनियोग करून शाळेचा विकास करण्यासाठी दहा सदस्यांची समिती स्थापन करून बँकेत एक स्वतंत्र खाते खोलून व्यवहार करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली.
*शाळेत प्रत्येक वर्गात पंखा,टेबल,खुर्ची,विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेपूर बेंचची व्यवस्था,मुलींसाठी स्वतंत्र मुतारी आणि शौचालय,प्रोजेक्टर आणि संगणक दुरुस्ती,शाळेची रंगरंगोटी करणे,स्काऊट गाईड पथक आणि कब बुलबुल पथक नेमणे, शालेय परिसरात  परसबाग,कचऱ्यापासून गांडूळ खत आणि सेंद्रिय खतनिर्मिती,वृक्षारोपण,विविध फुलांच्या कुंड्या,गावात आणि शालेय परिसरात सिमेंट खुर्च्यांची व्यवस्था,शालेय ग्रंथालय आधुनिकीकरण इत्यादी गोष्टीवर चर्चा करून "माझी समृद्ध शिवणी" नावाचा वॉट्स अप ग्रुप बनवण्यात आला* आणि यामध्ये शिवणी गावातील कर्मचारी आणि माजी विद्यार्थी आणि पालक यांचा समावेश करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटील सर यांनी केले तर आभार श्री द्याडे सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील श्री मरखेलकर सर,मंदाडे सर,जनार्दन जाधव सर,प्रमोद रावणगावे सर आणि समस्त गावकरी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
      शेवटी वंदे मातरम गीताने अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले.
💐💐💐💐💐💐💐
शब्दांकन- श्री भोसले तानाजी निवृत्तीराव.(स.शि.) जि.प.प्रा.शा.शिवणी. ता.देगलूर.जि.नांदेड.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

Saturday, 29 June 2019

गाणे मुळाक्षरांचे

गाणे मुळाक्षरांचे

कमळातील क पाण्यातच राहिला
ख चा खटारा आम्ही नाही पाहिला
      ग च्या गळ्यात घालायची माळ
      घ च्या घरात रांगते बाळ
च च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊ
छ ची छत्री घेऊन पावसात जाऊ
      ज च्या जहाजात बसू कधीतरी
     झ च्या झबल्यात दिसेल न मी परी
ट चे टरबूज गोल गोल फिरते
ठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते
     ड चा डमरू वाजे किती छान
     ढ चे ढग वाटे कापसाचे रान
न च्या नळावर पाणी पिऊ चला
ण चा बाण कसा आभालात गेला
    त च्या हातामध्ये मोठी तलवार
    थ चा मोठा थवा जाई दूर फार
द च्या दरवाजात आहे कोण उभा
ध च्या धरणात पाणी किती बघा
     प चा पतंग ऊंच ऊंच फिरे
     फ च्या फणसात गोड गोड गरे
ब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मान
भ चे भडंग लागते छान
      म म मगर ही पाण्यातच राही
      य यमक कवितेत येई
र च्या रथाला चार चार घोडे
ल चे लसून भाजीत टाकू थोडे
      व च्या वजनाचे आकारच वेगळे
       श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळे
ष च्या षटकोनाला बाजू कोन सहा
स च्या सशाचे मोठे कान पहा
       ह चे हरिण चाले तुरू तुरू
      ळ च्या बाळाला नका कोणी मारू
क्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर
       पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे
       चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे

संकलित

जि प हा मुलींची मुखेड येथील पालक सभा


महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (MIEB)संलगन्ता प्राप्त शाळा जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड येथे पालक सभा संपन्न

दि.29/06/2019
वार - शनिवार
आज जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड येथे पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील पालकसभेचे
  अध्यक्ष - म्हणुण शाळेचे मुख्याध्यापक श्री जि.सी.चव्हाण सर हे होते
प्रमुख पाहुणे -
*१)श्री भारती सर (ग.शि.अ.मुखेड)*
*२)पाटील सर (शि.वि.अ.मुखेड)*
*३)झंपलवाड सर (शि.वि.अ)*
*४)सौ.शारदाताई पाटील (महीला पालक प्रतिनिधी)*
*५)अँड.वि.जी.जाधव*
*६) श्री राजकुमार लाडगे(माजी नगरसेवक)*
*७)जयभीम सोनकांबळे(शा.व्य.स.ऊपाध्यक्ष )*
*८)श्री देवकांबळे सर (शिक्षक नेते)*
*९)मेहताब शेख,रियाज शेख,राजेंद्र धुळशेट्टे (पञकार बंधु )*
              ई.प्रमुख पाहुणे म्हणुण ऊपस्थित होते.
*सुरवात*
पालक सभेची सुरवात पालकांच्या नोंदणीपासुन करण्यात आली व लगेच त्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर ऊपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व दिपप्रज्वलन करुन पालकसभेची सुरवात करण्यात आली.
*स्वागत* - 
           ऊपस्थित अध्यक्ष ,ऊपाध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे व पालक वर्ग यांचे शब्दरुपी पुष्पाने शाळेतील मुलींनी स्वागत केले.
*प्रस्तावना* -   
            सदरील पालक सभेचा ऊद्देश श्री डोईजड सर यांनी प्रास्ताविकेतुन करुन दिला.यामध्ये त्यांनी MIEB काय आहे?मातृभाषेतुन शिक्षणाचे फायदे,पालक सभा का घ्यावी? पालक सभेतील विषय व पालकांना MIEB अभ्यासक्रम कसा आहे ते सांगीतले.
 *चर्चा पध्दतीने पालक सभा*-
                                       त्यानंतर सर्व पालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये चर्चा पध्दतीने पालक सभा खुप छान झाली.या चर्चेमध्ये पालक आपल्या समस्या सांगत होते व सर्व मान्यवर तसेच शिक्षक श्री तेहरा सर,दारकु सर,पालकांच्या शंका समाधान करत होते.यामध्ये पालकांच्या काही समस्या व प्रश्न आसे होते.
*MIEB मंडळ आहे तर कसे चालते?*
*अभ्यासक्रम कसा आहे?*
*गृहपाठ का नाही? आहे तर कसा असणार ?*
*पाठ्यपुस्तक कधी मिळणार?* *ते कशा स्वरूपात आहेत? विषय किती असणार?*
*आंतरराष्ट्रीय मंडळ म्हणताय मग मराठीत कसा अभ्यासक्रम ?*ईंग्रजी मध्ये का नाही विज्ञान व गणित?*
या व अशा आनेक प्रश्न पालकांनी विचारले या सर्व प्रश्नांची समाधानकारक ऊत्तरे पालकांना MIEB टिमकडून देण्यात आले.त्यामुळे सर्व पालक सभेदरम्यान सामाधान व्यक्त करत होते.व सर्वचजण अगदी ज्या शंका , समस्या घेऊन आले होते ते खुप समाधानी होऊन गेले.
तसेच *भारती सर गटशिक्षणाधिकारी मुखेड यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने पालकांना मातृभाषेतुन शिक्षणाचे महत्व काय आहे? प्रत्येक मुल वेगळे असुन त्याला त्याच्यासारखे होऊ द्या ? आपल्या मुलाची तुलना ईतर मुलांसोबत करु नका.तो स्वतंत्र आहे तसेच शिक्षणातील विविध बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला*.
पालक सुद्धा समाधानी झाले.

*MIEB च्या शै.कार्यासाठी पालक सहभाग*-
                         *MIEB च्या पहील्याच मिटिंगमध्ये श्री साधु शिवराज गुरुबसप्पा यांच्यातर्फे (कु.संस्कृती शिवराज साधु वर्ग १ला) या पालकाने आमच्या शैक्षणिक कार्यासाठी व शाळेच्या विकासासाठी ५०००/-( पाच हजार रु )  निधी धनादेशाच्या स्वरूपात सर्व मान्यवर यांच्या ऊपस्थितीत शाळेचे मु.अ.श्री जि.सी.चव्हाण सर यांच्याकडे सुपुर्द केला.सर्व पालक वर्गासह मान्यवर यांनी त्यांचे स्वागत केले.*

त्यानंतर पालक सभेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने पालक सभा संपन्न झाली.
*ही पालक सभा यशस्वी करण्यासाठी MIEB टिमच्या प्रमुख स्वामी मँडम  तसेच टाकळीकर मँडम ,लाटकर मँडम ,कुलकर्णी मँडम ,ऊमाटे मँडम,तेहरा सर ,दारकू* *सर,डोईजड सर,केँद्रे सर तसेच Lkg ukg MIEB टिमच्या सौ स्वामी मँडम,सौ चौव्हाण मँडम ,श्री सोनकांबवे सर यांनी परिश्रम घेतले.*
*पालक सभेचे सुञसंचालन श्री केँद्रे सर यांनी व आभार प्रदर्शन सौ ऊमाटे मँडम यांनी केले.*

               
               *धन्यवाद !*
            
             *शब्दांकन*
      *श्री  केँद्रे व्यंकटी संंतराम*
           *सहशिक्षक*
    *जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड*
          9403162293

दफ्तरमुक्त शाळा आणि निवडणूक शिवणी ता देगलूर

दफ्तरमुक्त शाळा आणि निवडणूक

शिवणी -  आज दिनांक 29:06:2019 रोजी  जि.प.प्रा.शा.शिवणी कें. होट्टल ता देगलूर येथे
शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शालेय  मुख्यमंत्र्याची निवड,  मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप संपन्न.
आज महिन्याचा शेवटचा शनिवार दप्तराविना शाळा हा उपक्रम चांगलाच गाजला तो लोकशाही पद्धतीने आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मतदान पद्धतीने.लोकशाहीत उमेदवार कोण,मतदार कोण,कोणत्या नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार असतो आणि मतमोजणी करून उमेदवार कसे निवडले जातात हा नागरिक शास्त्राचा भाग प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजून दाखवण्यात आला.
    विद्यार्थ्यांनीही या प्रक्रियेमध्ये तेवढाच जास्तीचा रस आणि उत्साह दाखवला.या प्रक्रियेमध्ये इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतच्या सहा विद्यार्थ्यांनी आपले  उमेदवारी अर्ज शाळेचे मु.अ.यांच्याकडे भरले होते.डिपॉजिट म्हणून प्रत्येकाकडून पाच रुपये भरून घेण्यात आले.आणि त्या सहाही विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.
      या प्रक्रियेमध्ये मतदार म्हणून आज पंचावन्न विद्यार्थी मतदारांनी आपला प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार बजावला.पोलिंग अधिकारी म्हणून शाळेतील विद्यार्थी बालाजी मल्लेवार,तुषार बुक्कावार,शुभम सोनकांबळे आणि श्री रावणगावे सर हे तीन क्र.अधिकारी म्हणून काम पाहिले.
   इयत्ता चौथी ते आठवी वर्गातील एकूण पंचावन्न  विद्यार्थी मतदारांनी सहा उमेदवारांसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान केले.
   मतदान प्रक्रियेनंतर लगेचच सर्व विद्यार्थ्यांच्या समोर मतदान मोजणी करण्यात आली.मतदान मोजणी अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षक श्री जनार्दन जाधव सर,विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री मरखेलकर सर आणि  योग गुरु श्री मंदाडे सर यांनी काम पाहिले.
      एकूण पंचावन्न  मतदानापैकी अरुण वीरभद्र बुक्के याला 31 मते पडली,कू.संजना जळबावार हिला 18 मते पडली आणि अपक्ष उमेदवार योगेश मोगावर याला 5 मते पडली.अरुण बुक्के याने संजना जळबावारचा 13 मतांनी पराभव करीत मुख्यमंत्री पद भूषविले.
     शेवटी शाळेचे मु.अ.तथा आजच्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यपालाच्या भूमिकेत राहून काम पाहणारे श्री जाधव हणमंत सर यांनी सर्व विजयी उमेदवारापैकी बुक्के अरुण याला मुख्यमंत्री,कू.संजना जलबावार हिला उपमुख्यमंत्री,सागर बुक्कावार याला स्वच्छतामंत्री,अंकुश शिंदे याला क्रीडामंत्री,योगेश मोगावर याला शिक्षणमंत्री,सुजित गायकवाड याला शालेय पोषण आहार मंत्री,तर महेश पेंडपल्ले यांच्याकडे शालेय देखरेख मंत्री पद सोपवून   गोपनीयतेची शपथ दिली आणि सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
      शेवटी मुख्यंमत्री अरुण बुक्के याने आपल्याकडे सोपवलेली सर्व जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचे आश्वासन दिले आणि सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.
   मतदान प्रक्रियेसाठी सर्व विद्यार्थी आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी सहकार्य केले.

शब्दांकन : - श्री भोसले सर.स.शि.
प्रा शा शिवणी ता. देगलूर जि. नांदेड

राजेश्वर कनकमवार

*मातृभक्ती व कर्तव्यनिष्ठा जपणारे  राजेश्वर कनकमवार. . . !!*

कुंडलवाडी येथील कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालयातील गेली 28 वर्षे लिपिकपदी अत्यंत प्रामाणिकपणे व आपल्या कार्याविषयीची निष्ठा सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत न सोडणारे मातृभक्त आदर्श लिपिक श्री.राजेश्वर ईरन्ना कनकमवार हे दि.30 जून 2019 रोजी नियत वयोमानाने प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवाभाव मातृभक्ती, कर्मनिष्ठा ही भावी पिढीला आदर्शवत राहणारी आहे. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख येथे देत आहोत.
'कपाळी अष्टगंध, गळ्यात तुळशीच्या माळा, आईच्या पायावर डोकं' ठेवल्याशिवाय उंबरठा ओलांडायचा नाही, असा जणू स्वतःला नियम घालून दिल्याप्रमाणे न चुकता देवदर्शन करून सकाळी सात वाजताच वर्तमानपत्रातील बातम्या, सुविचार, दिनविशेष, प्रश्नमंजुषा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी फळ्यावर लिहून आपल्या कारकूनी कामाची सुरुवात करणारे राजेश्वर कनकमवार हे एक आदर्शपुत्र, आदर्श कारकून, आदर्श व्यक्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दि.4 जून 1961 साली सामान्य कुटुंबात जन्मलेले राजेश्वर कनकमवार यांनी बालपणापासून आई श्रीमती रुक्मिणीबाई यांच्या विचार आणि संस्कारावर मार्गक्रमण केल्यानेच सुख समृद्धि प्राप्त झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. वयाच्या दहाव्या  बाराव्या वर्षापासुन जीवन जगण्याची त्यांची धडपड पाहिली तर त्यांनी येथील मद्याच्या म्हणजे दारूच्या दुकानात खारमुरे, फुटाने, शेंगदाणे, बेसनचे वडे, अंडी, पापड विक्री करून उदरनिर्वाहासाठी आईवडिलांना मदत केले. अनेक वर्ष कै.माधवरावजी बोधनकर यांनी स्थापन केलेल्या श्री. कुंडलेश्वर दूधडेअरीत स्वीपर ते सचिव पदावर कार्यरत राहिले. दूधडेअरीत काम करताना दर दिवशी 70 ते 80 लिटर दूध पन्नास पैसे कमिशनवर विक्री केली. त्यांनी अनेक वर्ष पेपर एजन्सी चालवली. येथील जिनिंग प्रेसिंगमध्येही मजूरी करीत. रस्ता मोजणीच्या कामावर लेबर म्हणून काम केले. त्यांचे मामा हरिदास व रामदास यांच्याकडून कपडे शिवण्याचे कसबही शिकून घेतले. काही काळ इरपबनियन पट्टयाच्या चड्ड्या, खमीस, झंपर इ.कापड शिवण्याचे काम केले. येथील बाजारसमितीत वार्डात वडिलांनी चालविलेल्या हॉटेलात चहा, मालपूरी, रव्याचे लाडू विक्री केल्याचे ते मोठ्या आनंदाने सांगतात. त्यांच्या स्वभावात नम्रता मोठ्यांबद्दल आदर, सहकार्याबद्दल आत्मियता, संस्था , शाळा आणि विद्यार्थ्याप्रती आस्था आणि कर्मावर निष्ठा पदोपदी दिसून येते.
समाजातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. त्यासाठी शिक्षकाने आपल्या कार्यात कधीच कसूर करू नये असे त्यांचे परखड मत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी शाळेत स्वखर्चाने आपल्या मुलाच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय  कै. विवेकानंद वादविवाद स्पर्धा 1997 पासून सहा वर्षे राबविले. त्याचबरोबर शाळेत दर महिन्यात प्रश्नमंजुषा  लेखी परीक्षा घेत असत. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत असे. त्यांनी आपल्या जीवनात देशसेवा व समाजसेवेला नितांत महत्त्व दिले. सेवेत असताना कुटुंबापेक्षा शालेय कार्याला अधिक वाहून घेतले. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, कोणीही दुखावले जावू नये याची ते सतत  काळजी घेत असत. माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, माजी राष्ट्रपती ए. पी.जे.अब्दूल कलाम, जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या व्यक्तीमत्वाचा ठसा त्यांच्या कृतीतून दिसून येते. कुंडलवाडीतील कै. माधवराव बोधनकर, कै. सयारामसेठ सब्बनवार, माजी आमदार कै. जयरामजी अंबेकर व माजी नगराध्यक्ष कै. के. रामलू यांना ते आपल्या जीवनाचे शिल्पकार मानतात. जीवनाचा कायापलट करण्यात कै. माधवरावजी बोधनकर यांचा सिंहाचा  वाटा आहे असे म्हणतात. 1981 मध्ये सौ.पार्वती जडलवार यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. आई, पत्नी, तीन मुले, दोन सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा सुखी परिवार आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी माणसे जोडण्याची कामे केली. आज वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ते सेवेतून निवृत्त जरी होत असले तरी सामाजिक कार्यातून सेवानिवृत्त होणार नाहीत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. .!!

शब्दांकन : सौ. सारिका राजेश सब्बनवार

 श्री राजेश्वर कनकमवार सर यांच्या विषयी त्यांच्या सहकाऱ्यांचे मत

माझ्यासाठी  एक पितृतुल्य आदर्शवत  प्रेरणास्थान आहेत.सुंदर हस्ताक्षर,व्यवस्थितपणा,नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, शिस्तप्रिय यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय राजेश्वरजी कनकमवार सर होय.त्यांच्यातील सुविचारांची शिदोरी मला आयुष्यात फलदायी ठरेल.
- सारिका मद्दलवार, सहशिक्षिका

 माझ्यासाठी ज्येष्ठ बंधू म्हणून लाभलेले आदर्श मार्गदर्शक आहेत.कार्यालयीन कामे,शिस्तबद्ध दस्तावेज व दररोज शालेय फलकलेखनाचा वारसा हे आपल्यातील पैलू आयुष्यात माझ्या कृतीतून कायमस्वरूपी जपेल.

- व्ही.एल.गट्टुवार
प्राथमिक मुख्याध्यापक कै.गं.पो.स.कुंडलवाडी


आपल्या कामात नेहमी व्यस्त राहणारे, सेवेतील त्यांची एकनिष्ठता, वक्तशीरपणा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागणारे माझ्यासाठी व कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत.

-  नागनाथ चेटलूरे, सहशिक्षक

शाळेतील प्रत्येक चिमुकल्यांना आपुलकीने खंड्या म्हणून साद घालणारे,  एका मुलाप्रमाणे जपणारे सरांचे कार्य माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी आहे.

- रमेश जाधव, सहशिक्षक


आदर्श व्यक्तिमत्व सहसा पुस्तकातून वाचतो.  पण खरंच आदर्श व्यक्तीचा सहवासाचा अनुभव आपले जीवनच  आदर्श बनविते... असा परिसासम सहवास लाभलेल्या आमच्या सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !!!

- विद्या वाघमारे, सहशिक्षिका

छोट्या छोट्या बोधकथेच्या माध्यमातून लहान मुलांसोबत समाजातील लोकांनाही नेहमीच प्रबोधन करण्याचे काम त्यांनी करत आले आहेत. सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा !
- नासा येवतीकर, स्तंभलेखक


सरांकडून मी 2002 पासुन बरेच गोष्टी शिकलो ते मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. ते माझ्यासाठी खरच एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरीही मला शब्द अपुरे वाटतात. अशा महान व्यक्तीमत्वाला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ..!!

- राजू जायेवार, सहशिक्षक

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.... या उक्ती प्रमाणे अखंड आपले जिवन  जगत असलेले आमचे आदरणीय सर....त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. तुम्हास दीर्घायुष्य, आरोग्य लाभो..

सुरेखा चोंडीकर सहशिक्षिका .

Tuesday, 28 August 2018

उपक्रमातून शिक्षण - अजय लिंबाजी पाटील

उपक्रमातून शिक्षण

क्रांतिकारकांची माहिती क्रांती महिन्यात

आज आपण उपक्रमातून शिक्षण या सदरखाली ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका अंतर्गत असलेली जिल्हा परिषद शाळा पिसवली या उपक्रमशील शाळेतील राज्यपुरस्कार प्राप्त अजय लिंबाजी पाटील जे की येथे पदवीधर शिक्षक यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमापैकी एका सुंदर उपक्रमाची माहिती पाहणार आहोत. जिल्हा परिषदेत ते गेल्या २९ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांची प्रथम नेमणूक दिनांक  २५/०४/१९८९ अशी असून यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद शाळा वाहोली, कल्याण ठाणे येथे कार्य केले आहे. ते एक क्रियाशिल शिक्षक असून विद्यार्थ्यांचे आवडते आहेत. त्यांनी आपल्या शाळेत एक सुंदर आणि सर्वांनी त्याचे अनुकरण करावे असा उपक्रम राबविला आहे. 

त्यांच्या उपक्रमाचे नाव आहे, क्रांतीकारकांच्या सहवासाने भारावली पिसवली शाळा.

आज आपण स्वतंत्र भारतात आनंदाने राहत आहोत.परंतु स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे गुलामीचा काळ. आपल्या भारत देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. इ.स. १६०० व्या शतकात इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून भारतात व्यापारासाठी आलेले इंग्रज हे आपल्या देशात राज्यकर्ते झाले. आपल्या देशातच आपण गुलाम म्हणून राहू लागलो. या गुलामगिरीतून आपल्या देशाला मुक्त केले ते आपल्या महान नेत्यांनी, क्रांतिकारकांनी. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता घरादाराचा, संसाराचा त्याग करून आपल्या देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवायचे हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. अनेकांनी सुखी संसार सोडून देशाची सेवा केली. मग त्यामध्ये महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा, सुभाष चंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारखे क्रांतीकारक आणि महान नेते होतेच परंतु अगदी बारा वर्षाच्या शिरिषकुमार सारखे शाळकरी मुलेही क्रांतिकारक म्हणून देशाच्या कामी आली. या  स्वातंत्र्यलढ्याची, क्रांतिकारकांची आठवण व विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावा, क्रांतिकारकांचे कार्य व त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने गेले बारा वर्षे जिल्हा परिषद शाळा पिसवली येथे ऑगस्ट क्रांती पंधरवडा साजरा केला जातो. 
एक ऑगस्ट रोजी लो. टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती  साजरी करुन त्या दिवसांपासून शाळेत आँगस्ट क्रांती पंधरवडयाला सुरुवात केली जाते.
1 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींजींनी इंग्रजांना चले जाव असा आदेश दिला आणि आपला देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या समीप पोहचला. परंतु आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण  व्हावे. मुलांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागृत व्हावी यासाठी क्रांतिकारकांच्या कथा पिसवली शाळेत मुलांना सांगितल्या जातात. पदवीधर शिक्षक अजय पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेतला जातो. या कथामालेत हुतात्मा शिरिषकुमार, भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील, चंद्रशेखर आझाद, लहुजी राघोजी साळवे, नारायण नागो पाटील, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबू गेनू, भगतसिंग,
चाफेकर बंधु यांच्या कथा सांगितल्या जाते तर मंगल पांडे हा चित्रपट मुलांना दाखवला जातो
हे कथाकथन अजय पाटील, सुभाष जनबंधु, मेघा पाटील, शर्मिला गायकवाड, महेंद्र अढांगळे, सरीता काळे  या शिक्षकांनी तयार केले आहे. तर भिवंडी तालुक्यातील श्रीमती सुचिता आरज मॅडम यांचेही कथाकथन या पंधरवडयाच्या निमित्ताने झाले आहे. त्यांनी चाफेकर बंधुंची कथा मुलांना समजेल अश्या भाषेत सांगितली.
याच कार्यक्रमात इयत्ता सहावीचा विद्यार्थी करण गोंड, सातवीची विद्यार्थीनी शिवानी संभाजी, सानिया शेख, आठवीचे विद्यार्थी सारीका नरळे, सारीका वेह्ले, पाचवीची मुले श्वेता चव्हाण, निकीता राठोड यांनीही कथावाचन केले.
काही मुलांनी या कथा लिहून काढल्या आहेत. तर काही मुलांनी क्रांतिकारकाच्या कथांचा संग्रह तयार केला आहे. 
पंधरा ऑगस्ट रोजी इयत्ता सहावीच्या मुलांनी शहीद शिरीषकुमार यांच्या जीवनावरील नाट्यप्रसंग सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी क्रांतीकारकांच्या वेशभूषेत मुले प्रभातफेरीत सामील झाली होती.
या उपक्रमातून भारतीय स्वातंत्र्य लढयाची आणि जुलमी इंग्रज राजवटीची माहिती मुलांना मिळते. देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतीकारकाच्या कार्याची माहिती मिळते. विद्यार्थांमध्ये देशप्रेम वाढीस लागते. शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होते. मान्यवरांची व्याख्याने ऐकल्याने विद्यार्थ्यांचे भावविश्व व्यापक बनते. तसेच नकळत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जातो. १८५७ उठाव, त्याची कारणे, उठावाचे लोण, व्याप्ती, उठावाच्या अपयशाची कारणे, सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, क्रांतीकारकांची भूमिगत चळवळ हे पाठ विद्यार्थ्यांना शिकवले जातात. दोनशे सव्वा दोनशे विद्यार्थी एकावेळी या कथा ऐकतात.
गेली बारा वर्षे हा ऑगस्ट क्रांतीचा हा कार्यक्रम पिसवली शाळेत सातत्याने साजरा होतो. 
संपूर्ण शाळा  पंधरा दिवस क्रांतिकारकांच्या सहवासाने भारावून जाते. या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी कौतुक केले आहे.तर अनेक शाळांना हा उपक्रम दिशा दर्शक ठरला आहे. आपणास या उपक्रमाविषयी जाणून घ्यायचे असेल तर अजय लिंबाजी पाटील यांच्या ajaylimbajipatil@gmail.com या email id वर किंवा 8422031680 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे. 

संकलन : नागोराव सा. येवतीकर
संयोजक, फ्रेश शालेय परिपाठ
9423625769