Monday, 5 August 2019

370 कलम

◾️जम्मू काश्मीरच्या संदर्भात आज जो काही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला त्याविषयी मोठी चर्चा देशभर सुरु आहे. पण हे प्रकरण नेमके काय आहे हे समजून घेणेही आवश्यक आहे. त्यासंदर्भात अन्य ग्रुपवरून सदर पोस्ट शेअर करतोय. शक्य असल्यास वाचा 👇

◾️कलम 370 जाणे का गरजेचे होते  ?

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

आज राज्यसभेमध्ये जम्मू आणि काश्मीरबाबत काही ऐतिहासिक घोषणा करण्यात आल्या. त्यानुसार कलम 370 आणि कलम 35 अ ही दोन कलमे निरर्थक बनवण्यात आले. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठनाचे विधेयक मांडण्यात आले. त्यानुसार सध्याच्या जम्मू-काश्मीरचे विभाजन करुन लडाख आणि जम्मू-काश्मीर हे दोन्ही स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. कलम 370 निरर्थक ठरवले का गरजेचे होते, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या कलमाचा इतिहास आणि गेल्या 70 वर्षात त्याअनुषंगाने घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्याव्या लागतील.
कसे आले 370?:-

जम्मूकाश्मिर हे संस्थान मुसलमान बहुल होते; पण तेथील राजा हरीसिंग हे हिंदू होते. भारतात विलिनीकरण करताना त्यांनी आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानने आदिम टोळ्यांच्या मदतीने हरिसिंगांच्या संस्थानावर हल्ला केला. त्यानंतर हरिसिंगांनी भारताकडे मदत मागितली. त्यासाठी भारताने हे संस्थान भारतात विलिन करा तरच आम्ही मदत करू अशी अट घातली. हरीसिंग यांनी यास सशर्त संमती दर्शवली. त्यांनी घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी  कलम 370 निर्माण झाले. त्यानंतर शेख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मिरच्या विधानसभेत ‘भारतीय प्रजासत्ताकामधील स्वतंत्र प्रजासत्ताक’ असा काश्मीरचा उल्लेख केला होता. इतकेच नव्हे तर काश्मीरच्या मुख्यमत्र्यांना पंतप्रधान संबोधले जाई.

अस्थायी 370 कलम-

ह्या कलमासंदर्भात भारताच्या घटनासमितीत चर्चा सुरू होती त्यावेळी मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रतिनिधित्व करणार्‍या रामास्वामी अय्यंगर यांनी देखील ही गोष्ट स्पष्ट केली होती की हे कलम पूर्णपणे अस्थायी स्वरूपाचे आहे. जम्मू काश्मिरमध्ये स्वतंत्र घटनासमिती तयार करण्यात आली होती आणि ती असेपर्यंत एक अंतरीम सरकार तिथे अस्तित्वात होते. त्या अंतरिम सरकारचे प्रमुख शेख अब्दुल्ला होते. हे अंतरिम सरकार अस्तित्वात असेल, जोपर्यंत तिथे घटनासमिती अस्तित्वात असेल तोपर्यंतच कलम 370 अस्तित्वात राहिल आणि त्यानंतर ते आपोआप विसर्जित होईल. याचे कारण भारतीय राज्यघटनेतील कलम 1 मधील (शेड्युल 1 )मध्ये 15व्या क्रमांकावर जम्मू काश्मिरचा समावेश झाला आहे. त्यामध्ये जम्मू काश्मिर भारताचा अविभाज्य घटक आहे असे म्हटले आहे. जम्मू काश्मिरची स्वतःची घटना असून त्यातील कलम 3 मध्येही याचा उल्लेख आहे. भारताची राज्यघटना अस्तित्वात आली त्याच वेळी जम्मूकाश्मिरची घटनाही अस्तित्वात आली. ज्या वेळी इन्स्ट्रुमेटशन अ‍ॅक्सेशन म्हणजेच विलिनीकरणाचा करार केला आणि  जम्मूकाश्मिरच्या विधीमंडळाने त्याला मान्यता दिली त्यानंतरच कलम 370 चे महत्त्व संपले होते. पण जम्मू काश्मिरसाठी जी घटनासमिती निर्माण कऱण्यात आली तिने या कलमावर कोणताही निर्णय घेतला नाही. हे कलम ठेवायचे किंवा नाही याविषयी ते काही बोलले नाही. त्यामुळे कलम 370 काढण्यासाठी या घटनासमितीची परवानगी आवश्यक ठरेल; पण घटनासमिती आता अस्तित्त्वात नसल्यामुळे आणि इन्स्ट्रुमेट ऑफ अ‍ॅक्सेशन अंमलात आल्यामुळे हे  कलम संपुष्टात आले होते. त्यामुळे या कलमाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे भारतीय संसदेचा होता आणि संसदेने याबाबत आता निर्णय घेतला आहे.
कलम 370 मुळे टाकण्याबाबतची भूमिका आहे.

घटना समितीत चर्चा :-

भारतीय राज्यघटनेत 370 वे कलम समाविष्ट करताना घटनासमितीमध्ये मोठी चर्चा झाली होती आणि तेव्हाही याविषयी अनेक मतमतांतरे होती. ती इतकी तीव्र होती की घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही काश्मिरला स्वतंत्र दर्जा दिले जाईल असे कोणतेही कलम भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत कऱण्यास स्पष्ट विरोध केला होता. परिणामी,  या कलमाचे ड्राफ्टिंग कसे करावे हा प्रश्न उभा राहिला होता. त्यावेळी पंडीत नेहरूंनी याचे ड्राफ्टिंग दुसर्‍याव व्यक्तीकडून करून घेतले होते. डॉ. आंबेडकरांनी हे कलम लिहिलेले नव्हते, हे अनेकांना माहीत नाही.
या कलमाने जम्मू-काश्मिरला स्वतंत्र दर्जा देण्यात आला होता.  भारतामध्ये सर्व निर्णय घेणारी यंत्रणा ही संसद आहे. पण सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार आणि कम्युनिकेशन या तीन गोष्टी सोडल्या तर  संसदेने बनवलेला अन्य कोणताही कायदा काश्मिरला लागू होत नाही जोपर्यंत काश्मिरची विधानसभा त्याला मान्यता देत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे, संपूर्ण भारतात विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे; तर जम्मूकाश्मिरमध्ये हा कार्यकाल आहे 6 वर्षांचा आहे. जम्मू काश्मिरच्या नागरिकांना दुहेरी नागरिकत्व आहे. सर्वांत मोठा मुद्दा म्हणजे, या कलमामुळे काश्मीरमध्ये इतर कुणालाही जमीन अथवा संपत्ती खरेदी करता येत नाही. इतकेच नव्हे तर  तिथे व्यवसाय करता येत नाही. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारही तिथे लागू होत नाहीत. विधानसभा बरखास्तीचे नियम तिथे लागू होत नाहीत. 

कलम 370 आणि काश्मिरमधील दहशतवाद :-

स्थानिक तरूणांमध्ये हा जिहादी दहशतवादाचा विचार येण्यासही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कलम 370 जबाबदार आहे. यासाठी एक उदाहरण पाहूया. 1998 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा मंजूर केला होता. त्यानुसार खासगी धार्मिक प्रार्थना स्थळांचा गैरवापर करण्यावर निर्बंध आणण्यात आले. धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी धार्मिक स्थळांचा वापर करता येणार नाही असे हा कायदा सांगतो. पण हा कायदा जम्मू काश्मिरमध्ये लागू झाला नाही.  परिणामी, आजही तिथल्या मशिदींतून मोठ्या प्रमाणावर जिहादचा नारा दिला जातो. तेथे भारतविरोधी घोषणा दिल्या जातात. तरूणांमध्ये जिहादची भावना वाढवण्यासाठी आवाहन केले जाते. तिथल्या काश्मिरी पंडीतांना तिथून हाकलून लावण्याचे आवाहन केले जाते. थोडक्यात,  एकप्रकारे असंतोष निर्माण करण्याचे काम धार्मिक स्थळांमधून होते आहे. त्यातून परात्म भाव वाढत गेला. दहशतवादाला खतपाणी मिळत गेले. इतकेच नव्हे तर दहशतवाद विरोधी कायदा किंवा यंत्रणा विकसित केल्या जातात त्याही या राज्याला लागू पडत नव्हत्या. त्याचा गैरफायदा तिथल्या धार्मिक मूलतत्ववाद्यांनी आणि फुटिरतावाद्यांनी घेतल्या.  दहशतवादाचा प्रसार वाढवण्यासाठी त्याचा वापर केला गेला. त्यामुळे जम्मू काश्मिरमधील स्थानिक दहशतवादाला 370 कलमच कारणीभूत असेल.
370 अपेक्षाभंग करणारे कलम :-

भारतीय राज्यघटनेत कलम 370 समाविष्ट झाल्यापासून आत्तापर्यंत गेल्या 74 वर्षांच्या कालखंडात दोन गोष्टींच्या आधारावर या कलमाचा पुनर्विचार करणे आवश्यक होते. भारतीय राज्यघटनेत हे कलम समाविष्ट करण्यात आले त्यावेळी याबाबत काही अपेक्षा होत्या. पहिली अपेक्षा होती की जम्मूकाश्मिरचे भारतीय संघराज्याबरोबर अधिकाधिक एकीकरण करायला हवे. तो मुख्य धारेत मिसळला जायला हवा. हे कलम समाविष्ट केल्याने तिथल्या लोकांचा, नागरिकांचा महिलांचा विकास व्हायला हवा. पण या दोन परिमाणांवर आधारीत या कलमाचे परीक्षण केल्यास त्याचे उत्तर नकारात्मक येते. 

संसदेच्या सार्वभौम अधिकारावर मर्यादा :-

आतापर्यंत देशभरातील जवळपास 100 हून अधिक कायदे जम्मू काश्मिरमध्ये लागू करता येत नव्हते. अगदी माहितीचा अधिकारसारखा कायदाही तेथे लागू होऊ शकत नव्हता. आज 70 वर्षांनंतरही तिथे पंचायत राज व्यवस्था नीटपणे लागू होऊ शकलेली नाही. अजूनही तळागाळातील लोकांचे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण होऊ शकलेले नाही. भारतीय संसदेने तयार केलेला कायदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी तेथील विधानसभेकडून मान्यता घ्यावी लागायची. निवडणूक आयोगालाही जम्मू-काश्मिरमध्ये परवानगी नव्हती. सर्वोच्च न्यायालयालाही 1950च्या दशकापर्यंत याबाबत निर्बंध घालण्यात आले होते. एवढेच नव्हे तर 1950 पर्यंत त्या राज्यात प्रवेश करण्यासाठीही परवानगीची गरज लागत होती. या सर्वांचा परिणाम असा झाला की, देशपातळीवर सबंध देशवासियांसाठी लागू केलेले   कायदे जम्मू काश्मिरमधील नागरिकांसाठी लागू करता आले नाहीत. महिला कल्याणासाठीचे कायदे लागू होऊ शकलेले नाहीत. अशा 100 हून अधिक कायद्यांचा फायदा तेथील जनतेला झालाच नाही. परिणामी, तिथल्या जनतेचे खर्‍या अर्थाने सबलीकरण होऊ शकले नाही.

मानसिक विलीनीकरणातील अडथळा :-

कलम 370 मुळे जम्मू काश्मिरला विशेष दर्जा मिळाला होता.  त्यामुळे भारतीय नागरिकांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत ही भावना तिथल्या स्थानिकांमध्ये वाढीस लागली. त्यांच्यामध्ये परात्मभाव वाढीस लागला. ते स्वतःला वेगळे समजू लागले. थोडक्यात, भारतीय संघराज्याबरोबर त्यांचे एकीकरण झालेच नाही. उलट त्यांना स्वतंत्र अस्तित्व मिळाले आणि परात्मभाव वाढीस लागला आणि  जम्मू-काश्मिरच्या विकासामधील, नागरिकांच्या सक्षमीकरणातील सर्वात मोठा अडथळा हा 370 कलम ठरले. त्याचप्रमाणे त्या राज्याचे भारतीय संघराज्यामध्ये मानसिक विलिनीकरण (सायकोलॉजिकल असिमिलेशन) ही झाले नाही.

Copy & paste

शिवणी येथे गणवेष वाटप


शिवणी ता. देगलूर येथे शालेय गणवेश वाटप

आज दि.05/08/2019 रोजी जि.प.प्रा.शा.शिवणी येथे पवित्र श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी सणानिमित्त विद्यार्थ्यांना शै.वर्ष 2019-20 अंतर्गत शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष शा.व्य.स.अध्यक्ष श्रीमान  लक्ष्मण आलुरे,प्रमुख अतिथी म्हणून शिवणी गावचे सरपंच तथा माजी पं.स.सदस्य श्री रमेशदादा सोनकांबळे,शिवणी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक मु.अ.श्री जाधव हनमंत सर, उप.सरपंच श्री बसवंत जक्कावार,तं.मु.अध्यक्ष श्री वीरभद्र पाटील,श्री मोगावर शिवराज सर,श्री उमाकांत बुक्कावार,श्री सतीश वाघमारे,डॉ.सदानंद मंदाडे आणि समस्त शिक्षणप्रिय गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
      कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अशी की,सर्व शिक्षा अभियान अंतर्गत एकूण 179 विद्यर्थ्यांपैकी सर्व मुली आणि अनु.जाती.,अनु.जमाती,बी.पी.एल.मुले असे एकूण 129 मुले यांनाच दोन गणवेश असताना शाळेचे मु.अ.श्री जाधव हणमंत सर आणि शा.व्य.स.अध्यक्ष यांच्या निस्वार्थी त्यागामुळे  खुल्या आणि N.T. प्रवर्गातील सरसकट 50 मुलांना दोन दोन गणवेश प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक यांचेकडे लग्नातील आहेराप्रमाणे त्यांच्या मांडीवर ठेवून देण्यात आले.त्यामुळे खुल्या आणि NT प्रवर्गातील गरीब व  आर्थिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांना खरा न्याय आणि मोठा आधार मिळाला आहे.
   तसेच एकीकडे समाजातील सण आणि उत्सव नाहीसे होत चालले असताना त्या सणांना नवसंजीवनी देण्याचे काम शाळेतील सर्व शिक्षक आणि उत्साही  विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.समस्त गावकरी आणि मान्यवरांच्या समक्ष शाळेतील सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पंचमीची "भुलई"खेळली.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मु.अ.श्री जाधव सरांनी केले.तर सूत्रसंचालन श्री विश्वनाथ पाटील सर यांनी केले.आभार श्री जनार्दन जाधव सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गंगाधर द्याडे सर,श्री इररेड्डी मंदाडे सर,श्री जाकेरपाशा मरखेलकर सर,श्री प्रमोद रावणगावे सर आणि श्री भोसले तानाजी सर यांनी  विशेष प्रयत्न केले.
      शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले.

*शब्दांकन=श्री भोसले तानाजी नि.(स.शि.प्रा. शा.शिवणी कें.होट्टल ता.देगलूर)*.

Monday, 15 July 2019

पालक मेळावा शिवणी

प्रा.शा.शिवणी ता. देगलूर  येथे पालक मेळावा संपन्न

"ही आवडते मज मनापासूनि शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा." या म्हणीप्रमाणे
       आज दिनांक 15:07:2019 रोजी जि.प.प्रा.शा.शिवणी येथे आजी माजी विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शा.व्य.स.चे उपाध्यक्ष श्री बस्वराज तंगावार प्रमुख अतिथी म्हणून तं.मु.समितीचे अध्यक्ष श्री वीरभद्र पाटील,माजी अध्यक्ष श्री संग्राम जळबावार,श्री माधव मामा जक्कावार,श्री आनंदजी भीमावार,श्री बसवंत कवरे,आणि देवापूर येथील विद्यार्थीप्रिय आणि शिक्षणप्रेमी पालक श्री बसवंत आमटे हे उपस्थित होते.
"शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा."
     शाळेतील काही  विद्यार्थिनींनी आपल्या मंजुळ स्वरात उपस्थित सर्व मान्यवर आणि पालकांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मु.अ.श्री जाधव हणमंत सर यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी सर्व पालकांना शाळेच्या सध्यस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यात समेट घडून येणे महत्वाचे आहे तेंव्हाच शाळेचा पर्यायाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा सर्वांगीण विकास होतो."विना सहकार नही उद्धार"या म्हणीप्रमाणे शाळेतील सर्व आजी माजी शिक्षणप्रेमी विद्यार्थी पालकांनी शाळेच्या विकासासाठी एकत्र येऊन शाळेचे आणि शिवणी गावचे ऋण फेडणे आणि नाव रोशन करणे गरजेचे आहे.शाळेच्या विकासासाठी शाळेतील सर्व पालकांनी प्रत्येकी एक हजार (1000$) देण्याचे आश्वसन दिले आणि जमलेल्या निधीतून शाळेतील सर्व भौतिक सुविधा पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली.
शाळेचे मु.अ.यांनी येत्या काही दिवसात शाळेला ISO मानांकन मिळवून देण्याचे आश्वसन दिले.त्यासाठी गावातील पालकांनी 175 विद्यार्थ्यांच्या आणि गावातील काही याचं शाळेतून शिकून मोठ्या पदावर विराजमान झालेल्या विद्यार्थ्यांकडून भरघोस मदत शाळेसाठी जमा करून देऊन देगलूर तालुक्यातील पहिली डिजिटल असलेल्या  शाळेला प्रगतीच्या एका अतिउच्च स्थानावर पोहचवण्याचे आश्वसन दिले.ज्यामध्ये शिवणी गावचे नाव रोशन करणारे भूमिपुत्र *अजय माधवराव पाटील,अक्षय माधवराव पाटील दोनीही (PSI)आणि चैनपुरे गुरुजी* यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला."ज्या घरट्याने पंखात उंच गगनभरारी घेण्याचे बळ निर्माण केले त्याला कसे विसरावे" या भावनेतून आपणही शाळेचे काहीतरी ऋण फेडणे लागते आणि त्यांच्याकडूनही भरीव मदत करून घेण्याचे मान्य करण्यात आले.  उपस्थित पालकातून लगेच पैसे जमा करून जमा रकमेचा योग्य विनियोग करून शाळेचा विकास करण्यासाठी दहा सदस्यांची समिती स्थापन करून बँकेत एक स्वतंत्र खाते खोलून व्यवहार करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली.
*शाळेत प्रत्येक वर्गात पंखा,टेबल,खुर्ची,विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेपूर बेंचची व्यवस्था,मुलींसाठी स्वतंत्र मुतारी आणि शौचालय,प्रोजेक्टर आणि संगणक दुरुस्ती,शाळेची रंगरंगोटी करणे,स्काऊट गाईड पथक आणि कब बुलबुल पथक नेमणे, शालेय परिसरात  परसबाग,कचऱ्यापासून गांडूळ खत आणि सेंद्रिय खतनिर्मिती,वृक्षारोपण,विविध फुलांच्या कुंड्या,गावात आणि शालेय परिसरात सिमेंट खुर्च्यांची व्यवस्था,शालेय ग्रंथालय आधुनिकीकरण इत्यादी गोष्टीवर चर्चा करून "माझी समृद्ध शिवणी" नावाचा वॉट्स अप ग्रुप बनवण्यात आला* आणि यामध्ये शिवणी गावातील कर्मचारी आणि माजी विद्यार्थी आणि पालक यांचा समावेश करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटील सर यांनी केले तर आभार श्री द्याडे सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील श्री मरखेलकर सर,मंदाडे सर,जनार्दन जाधव सर,प्रमोद रावणगावे सर आणि समस्त गावकरी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
      शेवटी वंदे मातरम गीताने अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले.
💐💐💐💐💐💐💐
शब्दांकन- श्री भोसले तानाजी निवृत्तीराव.(स.शि.) जि.प.प्रा.शा.शिवणी. ता.देगलूर.जि.नांदेड.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

Saturday, 29 June 2019

गाणे मुळाक्षरांचे

गाणे मुळाक्षरांचे

कमळातील क पाण्यातच राहिला
ख चा खटारा आम्ही नाही पाहिला
      ग च्या गळ्यात घालायची माळ
      घ च्या घरात रांगते बाळ
च च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊ
छ ची छत्री घेऊन पावसात जाऊ
      ज च्या जहाजात बसू कधीतरी
     झ च्या झबल्यात दिसेल न मी परी
ट चे टरबूज गोल गोल फिरते
ठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते
     ड चा डमरू वाजे किती छान
     ढ चे ढग वाटे कापसाचे रान
न च्या नळावर पाणी पिऊ चला
ण चा बाण कसा आभालात गेला
    त च्या हातामध्ये मोठी तलवार
    थ चा मोठा थवा जाई दूर फार
द च्या दरवाजात आहे कोण उभा
ध च्या धरणात पाणी किती बघा
     प चा पतंग ऊंच ऊंच फिरे
     फ च्या फणसात गोड गोड गरे
ब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मान
भ चे भडंग लागते छान
      म म मगर ही पाण्यातच राही
      य यमक कवितेत येई
र च्या रथाला चार चार घोडे
ल चे लसून भाजीत टाकू थोडे
      व च्या वजनाचे आकारच वेगळे
       श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळे
ष च्या षटकोनाला बाजू कोन सहा
स च्या सशाचे मोठे कान पहा
       ह चे हरिण चाले तुरू तुरू
      ळ च्या बाळाला नका कोणी मारू
क्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर
       पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे
       चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे

संकलित

जि प हा मुलींची मुखेड येथील पालक सभा


महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (MIEB)संलगन्ता प्राप्त शाळा जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड येथे पालक सभा संपन्न

दि.29/06/2019
वार - शनिवार
आज जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड येथे पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील पालकसभेचे
  अध्यक्ष - म्हणुण शाळेचे मुख्याध्यापक श्री जि.सी.चव्हाण सर हे होते
प्रमुख पाहुणे -
*१)श्री भारती सर (ग.शि.अ.मुखेड)*
*२)पाटील सर (शि.वि.अ.मुखेड)*
*३)झंपलवाड सर (शि.वि.अ)*
*४)सौ.शारदाताई पाटील (महीला पालक प्रतिनिधी)*
*५)अँड.वि.जी.जाधव*
*६) श्री राजकुमार लाडगे(माजी नगरसेवक)*
*७)जयभीम सोनकांबळे(शा.व्य.स.ऊपाध्यक्ष )*
*८)श्री देवकांबळे सर (शिक्षक नेते)*
*९)मेहताब शेख,रियाज शेख,राजेंद्र धुळशेट्टे (पञकार बंधु )*
              ई.प्रमुख पाहुणे म्हणुण ऊपस्थित होते.
*सुरवात*
पालक सभेची सुरवात पालकांच्या नोंदणीपासुन करण्यात आली व लगेच त्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर ऊपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व दिपप्रज्वलन करुन पालकसभेची सुरवात करण्यात आली.
*स्वागत* - 
           ऊपस्थित अध्यक्ष ,ऊपाध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे व पालक वर्ग यांचे शब्दरुपी पुष्पाने शाळेतील मुलींनी स्वागत केले.
*प्रस्तावना* -   
            सदरील पालक सभेचा ऊद्देश श्री डोईजड सर यांनी प्रास्ताविकेतुन करुन दिला.यामध्ये त्यांनी MIEB काय आहे?मातृभाषेतुन शिक्षणाचे फायदे,पालक सभा का घ्यावी? पालक सभेतील विषय व पालकांना MIEB अभ्यासक्रम कसा आहे ते सांगीतले.
 *चर्चा पध्दतीने पालक सभा*-
                                       त्यानंतर सर्व पालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये चर्चा पध्दतीने पालक सभा खुप छान झाली.या चर्चेमध्ये पालक आपल्या समस्या सांगत होते व सर्व मान्यवर तसेच शिक्षक श्री तेहरा सर,दारकु सर,पालकांच्या शंका समाधान करत होते.यामध्ये पालकांच्या काही समस्या व प्रश्न आसे होते.
*MIEB मंडळ आहे तर कसे चालते?*
*अभ्यासक्रम कसा आहे?*
*गृहपाठ का नाही? आहे तर कसा असणार ?*
*पाठ्यपुस्तक कधी मिळणार?* *ते कशा स्वरूपात आहेत? विषय किती असणार?*
*आंतरराष्ट्रीय मंडळ म्हणताय मग मराठीत कसा अभ्यासक्रम ?*ईंग्रजी मध्ये का नाही विज्ञान व गणित?*
या व अशा आनेक प्रश्न पालकांनी विचारले या सर्व प्रश्नांची समाधानकारक ऊत्तरे पालकांना MIEB टिमकडून देण्यात आले.त्यामुळे सर्व पालक सभेदरम्यान सामाधान व्यक्त करत होते.व सर्वचजण अगदी ज्या शंका , समस्या घेऊन आले होते ते खुप समाधानी होऊन गेले.
तसेच *भारती सर गटशिक्षणाधिकारी मुखेड यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने पालकांना मातृभाषेतुन शिक्षणाचे महत्व काय आहे? प्रत्येक मुल वेगळे असुन त्याला त्याच्यासारखे होऊ द्या ? आपल्या मुलाची तुलना ईतर मुलांसोबत करु नका.तो स्वतंत्र आहे तसेच शिक्षणातील विविध बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला*.
पालक सुद्धा समाधानी झाले.

*MIEB च्या शै.कार्यासाठी पालक सहभाग*-
                         *MIEB च्या पहील्याच मिटिंगमध्ये श्री साधु शिवराज गुरुबसप्पा यांच्यातर्फे (कु.संस्कृती शिवराज साधु वर्ग १ला) या पालकाने आमच्या शैक्षणिक कार्यासाठी व शाळेच्या विकासासाठी ५०००/-( पाच हजार रु )  निधी धनादेशाच्या स्वरूपात सर्व मान्यवर यांच्या ऊपस्थितीत शाळेचे मु.अ.श्री जि.सी.चव्हाण सर यांच्याकडे सुपुर्द केला.सर्व पालक वर्गासह मान्यवर यांनी त्यांचे स्वागत केले.*

त्यानंतर पालक सभेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने पालक सभा संपन्न झाली.
*ही पालक सभा यशस्वी करण्यासाठी MIEB टिमच्या प्रमुख स्वामी मँडम  तसेच टाकळीकर मँडम ,लाटकर मँडम ,कुलकर्णी मँडम ,ऊमाटे मँडम,तेहरा सर ,दारकू* *सर,डोईजड सर,केँद्रे सर तसेच Lkg ukg MIEB टिमच्या सौ स्वामी मँडम,सौ चौव्हाण मँडम ,श्री सोनकांबवे सर यांनी परिश्रम घेतले.*
*पालक सभेचे सुञसंचालन श्री केँद्रे सर यांनी व आभार प्रदर्शन सौ ऊमाटे मँडम यांनी केले.*

               
               *धन्यवाद !*
            
             *शब्दांकन*
      *श्री  केँद्रे व्यंकटी संंतराम*
           *सहशिक्षक*
    *जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड*
          9403162293

दफ्तरमुक्त शाळा आणि निवडणूक शिवणी ता देगलूर

दफ्तरमुक्त शाळा आणि निवडणूक

शिवणी -  आज दिनांक 29:06:2019 रोजी  जि.प.प्रा.शा.शिवणी कें. होट्टल ता देगलूर येथे
शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शालेय  मुख्यमंत्र्याची निवड,  मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप संपन्न.
आज महिन्याचा शेवटचा शनिवार दप्तराविना शाळा हा उपक्रम चांगलाच गाजला तो लोकशाही पद्धतीने आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मतदान पद्धतीने.लोकशाहीत उमेदवार कोण,मतदार कोण,कोणत्या नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार असतो आणि मतमोजणी करून उमेदवार कसे निवडले जातात हा नागरिक शास्त्राचा भाग प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजून दाखवण्यात आला.
    विद्यार्थ्यांनीही या प्रक्रियेमध्ये तेवढाच जास्तीचा रस आणि उत्साह दाखवला.या प्रक्रियेमध्ये इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतच्या सहा विद्यार्थ्यांनी आपले  उमेदवारी अर्ज शाळेचे मु.अ.यांच्याकडे भरले होते.डिपॉजिट म्हणून प्रत्येकाकडून पाच रुपये भरून घेण्यात आले.आणि त्या सहाही विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.
      या प्रक्रियेमध्ये मतदार म्हणून आज पंचावन्न विद्यार्थी मतदारांनी आपला प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार बजावला.पोलिंग अधिकारी म्हणून शाळेतील विद्यार्थी बालाजी मल्लेवार,तुषार बुक्कावार,शुभम सोनकांबळे आणि श्री रावणगावे सर हे तीन क्र.अधिकारी म्हणून काम पाहिले.
   इयत्ता चौथी ते आठवी वर्गातील एकूण पंचावन्न  विद्यार्थी मतदारांनी सहा उमेदवारांसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान केले.
   मतदान प्रक्रियेनंतर लगेचच सर्व विद्यार्थ्यांच्या समोर मतदान मोजणी करण्यात आली.मतदान मोजणी अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षक श्री जनार्दन जाधव सर,विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री मरखेलकर सर आणि  योग गुरु श्री मंदाडे सर यांनी काम पाहिले.
      एकूण पंचावन्न  मतदानापैकी अरुण वीरभद्र बुक्के याला 31 मते पडली,कू.संजना जळबावार हिला 18 मते पडली आणि अपक्ष उमेदवार योगेश मोगावर याला 5 मते पडली.अरुण बुक्के याने संजना जळबावारचा 13 मतांनी पराभव करीत मुख्यमंत्री पद भूषविले.
     शेवटी शाळेचे मु.अ.तथा आजच्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यपालाच्या भूमिकेत राहून काम पाहणारे श्री जाधव हणमंत सर यांनी सर्व विजयी उमेदवारापैकी बुक्के अरुण याला मुख्यमंत्री,कू.संजना जलबावार हिला उपमुख्यमंत्री,सागर बुक्कावार याला स्वच्छतामंत्री,अंकुश शिंदे याला क्रीडामंत्री,योगेश मोगावर याला शिक्षणमंत्री,सुजित गायकवाड याला शालेय पोषण आहार मंत्री,तर महेश पेंडपल्ले यांच्याकडे शालेय देखरेख मंत्री पद सोपवून   गोपनीयतेची शपथ दिली आणि सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
      शेवटी मुख्यंमत्री अरुण बुक्के याने आपल्याकडे सोपवलेली सर्व जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचे आश्वासन दिले आणि सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.
   मतदान प्रक्रियेसाठी सर्व विद्यार्थी आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी सहकार्य केले.

शब्दांकन : - श्री भोसले सर.स.शि.
प्रा शा शिवणी ता. देगलूर जि. नांदेड

राजेश्वर कनकमवार

*मातृभक्ती व कर्तव्यनिष्ठा जपणारे  राजेश्वर कनकमवार. . . !!*

कुंडलवाडी येथील कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालयातील गेली 28 वर्षे लिपिकपदी अत्यंत प्रामाणिकपणे व आपल्या कार्याविषयीची निष्ठा सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत न सोडणारे मातृभक्त आदर्श लिपिक श्री.राजेश्वर ईरन्ना कनकमवार हे दि.30 जून 2019 रोजी नियत वयोमानाने प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवाभाव मातृभक्ती, कर्मनिष्ठा ही भावी पिढीला आदर्शवत राहणारी आहे. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख येथे देत आहोत.
'कपाळी अष्टगंध, गळ्यात तुळशीच्या माळा, आईच्या पायावर डोकं' ठेवल्याशिवाय उंबरठा ओलांडायचा नाही, असा जणू स्वतःला नियम घालून दिल्याप्रमाणे न चुकता देवदर्शन करून सकाळी सात वाजताच वर्तमानपत्रातील बातम्या, सुविचार, दिनविशेष, प्रश्नमंजुषा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी फळ्यावर लिहून आपल्या कारकूनी कामाची सुरुवात करणारे राजेश्वर कनकमवार हे एक आदर्शपुत्र, आदर्श कारकून, आदर्श व्यक्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दि.4 जून 1961 साली सामान्य कुटुंबात जन्मलेले राजेश्वर कनकमवार यांनी बालपणापासून आई श्रीमती रुक्मिणीबाई यांच्या विचार आणि संस्कारावर मार्गक्रमण केल्यानेच सुख समृद्धि प्राप्त झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. वयाच्या दहाव्या  बाराव्या वर्षापासुन जीवन जगण्याची त्यांची धडपड पाहिली तर त्यांनी येथील मद्याच्या म्हणजे दारूच्या दुकानात खारमुरे, फुटाने, शेंगदाणे, बेसनचे वडे, अंडी, पापड विक्री करून उदरनिर्वाहासाठी आईवडिलांना मदत केले. अनेक वर्ष कै.माधवरावजी बोधनकर यांनी स्थापन केलेल्या श्री. कुंडलेश्वर दूधडेअरीत स्वीपर ते सचिव पदावर कार्यरत राहिले. दूधडेअरीत काम करताना दर दिवशी 70 ते 80 लिटर दूध पन्नास पैसे कमिशनवर विक्री केली. त्यांनी अनेक वर्ष पेपर एजन्सी चालवली. येथील जिनिंग प्रेसिंगमध्येही मजूरी करीत. रस्ता मोजणीच्या कामावर लेबर म्हणून काम केले. त्यांचे मामा हरिदास व रामदास यांच्याकडून कपडे शिवण्याचे कसबही शिकून घेतले. काही काळ इरपबनियन पट्टयाच्या चड्ड्या, खमीस, झंपर इ.कापड शिवण्याचे काम केले. येथील बाजारसमितीत वार्डात वडिलांनी चालविलेल्या हॉटेलात चहा, मालपूरी, रव्याचे लाडू विक्री केल्याचे ते मोठ्या आनंदाने सांगतात. त्यांच्या स्वभावात नम्रता मोठ्यांबद्दल आदर, सहकार्याबद्दल आत्मियता, संस्था , शाळा आणि विद्यार्थ्याप्रती आस्था आणि कर्मावर निष्ठा पदोपदी दिसून येते.
समाजातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. त्यासाठी शिक्षकाने आपल्या कार्यात कधीच कसूर करू नये असे त्यांचे परखड मत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी शाळेत स्वखर्चाने आपल्या मुलाच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय  कै. विवेकानंद वादविवाद स्पर्धा 1997 पासून सहा वर्षे राबविले. त्याचबरोबर शाळेत दर महिन्यात प्रश्नमंजुषा  लेखी परीक्षा घेत असत. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत असे. त्यांनी आपल्या जीवनात देशसेवा व समाजसेवेला नितांत महत्त्व दिले. सेवेत असताना कुटुंबापेक्षा शालेय कार्याला अधिक वाहून घेतले. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, कोणीही दुखावले जावू नये याची ते सतत  काळजी घेत असत. माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, माजी राष्ट्रपती ए. पी.जे.अब्दूल कलाम, जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या व्यक्तीमत्वाचा ठसा त्यांच्या कृतीतून दिसून येते. कुंडलवाडीतील कै. माधवराव बोधनकर, कै. सयारामसेठ सब्बनवार, माजी आमदार कै. जयरामजी अंबेकर व माजी नगराध्यक्ष कै. के. रामलू यांना ते आपल्या जीवनाचे शिल्पकार मानतात. जीवनाचा कायापलट करण्यात कै. माधवरावजी बोधनकर यांचा सिंहाचा  वाटा आहे असे म्हणतात. 1981 मध्ये सौ.पार्वती जडलवार यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. आई, पत्नी, तीन मुले, दोन सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा सुखी परिवार आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी माणसे जोडण्याची कामे केली. आज वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ते सेवेतून निवृत्त जरी होत असले तरी सामाजिक कार्यातून सेवानिवृत्त होणार नाहीत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. .!!

शब्दांकन : सौ. सारिका राजेश सब्बनवार

 श्री राजेश्वर कनकमवार सर यांच्या विषयी त्यांच्या सहकाऱ्यांचे मत

माझ्यासाठी  एक पितृतुल्य आदर्शवत  प्रेरणास्थान आहेत.सुंदर हस्ताक्षर,व्यवस्थितपणा,नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, शिस्तप्रिय यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय राजेश्वरजी कनकमवार सर होय.त्यांच्यातील सुविचारांची शिदोरी मला आयुष्यात फलदायी ठरेल.
- सारिका मद्दलवार, सहशिक्षिका

 माझ्यासाठी ज्येष्ठ बंधू म्हणून लाभलेले आदर्श मार्गदर्शक आहेत.कार्यालयीन कामे,शिस्तबद्ध दस्तावेज व दररोज शालेय फलकलेखनाचा वारसा हे आपल्यातील पैलू आयुष्यात माझ्या कृतीतून कायमस्वरूपी जपेल.

- व्ही.एल.गट्टुवार
प्राथमिक मुख्याध्यापक कै.गं.पो.स.कुंडलवाडी


आपल्या कामात नेहमी व्यस्त राहणारे, सेवेतील त्यांची एकनिष्ठता, वक्तशीरपणा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागणारे माझ्यासाठी व कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत.

-  नागनाथ चेटलूरे, सहशिक्षक

शाळेतील प्रत्येक चिमुकल्यांना आपुलकीने खंड्या म्हणून साद घालणारे,  एका मुलाप्रमाणे जपणारे सरांचे कार्य माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी आहे.

- रमेश जाधव, सहशिक्षक


आदर्श व्यक्तिमत्व सहसा पुस्तकातून वाचतो.  पण खरंच आदर्श व्यक्तीचा सहवासाचा अनुभव आपले जीवनच  आदर्श बनविते... असा परिसासम सहवास लाभलेल्या आमच्या सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !!!

- विद्या वाघमारे, सहशिक्षिका

छोट्या छोट्या बोधकथेच्या माध्यमातून लहान मुलांसोबत समाजातील लोकांनाही नेहमीच प्रबोधन करण्याचे काम त्यांनी करत आले आहेत. सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा !
- नासा येवतीकर, स्तंभलेखक


सरांकडून मी 2002 पासुन बरेच गोष्टी शिकलो ते मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. ते माझ्यासाठी खरच एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरीही मला शब्द अपुरे वाटतात. अशा महान व्यक्तीमत्वाला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ..!!

- राजू जायेवार, सहशिक्षक

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.... या उक्ती प्रमाणे अखंड आपले जिवन  जगत असलेले आमचे आदरणीय सर....त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. तुम्हास दीर्घायुष्य, आरोग्य लाभो..

सुरेखा चोंडीकर सहशिक्षिका .